एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र व वसाहत परिसराच्या सुरक्षेचा विचार करता, वीज केंद्र वसाहतीत असामाजिक तत्त्वांकडून उपद्रव व दहशत निर्माण करण्याची शक्यता गृहीत धरून वीज केंद्र व कर्मचारी वसाहतीची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाºयांनी आपला रहिवासी गाळा भाड्याने देऊ नये. दिला असल्यास तत्काळ रिकामा करून घ्यावा, वसाहतीत येणारे फेरीवाले, अनोळखी इसम, एसटी बसेस व इतर वाहनांची तपासणी टीआरडी गेट नं. १ व नवीन डी गेट नं. २ येथे करण्यात येईल. या दोन्ही गेटमधून प्रवेश करणाºया सर्व वाहनधारकांची रीतसर नोंद केली जाईल. वसाहतीतील रहिवाशांकडे घरकामासाठी येणारे कामगार, दूधवाले, पेपरवाले यांना गेटपास देण्यात येणार असून, गेटपासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. वसाहत परिसरातील सर्व दुकाने रात्री ९ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात यावे तसेच वसाहत परिसरात रात्री कट्ट्यावर बसणाºया मुलांना पालकांनी समज द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एकलहरे वीज केंद्राची सुरक्षा वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:57 IST