लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मित्र निवडणे आपल्या हातात असते, परंतु शेजारी आपल्याला निवडता येत नाही, दुर्दैवाने आपल्याला पाकिस्तानसारखा शेजारी लाभला असून, पाकिस्तानसह अन्य शेजारी राष्ट्रांकडून काश्मीर व सीमाभागात कुरापती करण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आम्ही आत घुसून मारू शकतो, असा इशारा दिला असून भारतीय लष्कराची वायुसेना, नौसेना व आर्मी ही तिन्ही संरक्षण दले देशाच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंह भदोरिया, उपाध्यक्ष सुभाष कुंद्रा, युवाअध्यक्ष विजेंद्र ठाकूर, महामंत्री गुलाबसिंह बेस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान, रामसिंग बावरी, सुनीलसिंह परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भामरे म्हणाले, देशाचे तिन्ही सैन्यदले शेजारी राष्ट्रांचा कोणताही हल्ला परतवून लावण्यात सक्षम आहे. भारतीय सैनिक प्राणाची पर्वा न करता रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देतात. या प्रत्येक जवानाच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेतून त्यांच्यातील क्षत्रियताच दिसून येते. देशावरील कोणत्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी या देशातील युवा वर्ग सदैव तयार असून, राष्ट्राचे संरक्षण हा क्षेत्रिय धर्मच असल्याचे भामरे म्हणाले. भारताला पाकिस्तानसारखा शेजारी लाभला असून, या देशात सत्तेसाठी सदैव सुरू असलेल्या कलहातून येथील राज्यकर्ते, सैन्य प्रशासन व अतिरेकी संघटना काश्मीरमध्ये कुरापती करून सातत्याने खोडसाळपणा करीत असतात. अशा प्रसंगांविरोधात नागरिकांमध्येही निर्माण होणारा संताप एक प्रकारची क्षत्रियताच असल्याचे भामरे म्हणाले. दरम्यान, गंजमाळपासून ते परशुराम सायखेडकर नाट्यगृहापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बेटी बचाओ, बेटी पढाओ, हुंडा बंदी, सामूहिक विवाह असे विविध घोषणाफलक हातात घेऊन जनजागृतीही करण्यात आली आहे.
देशाच्या संरक्षणासाठी तिन्ही सैन्यदले सक्षम
By admin | Updated: May 22, 2017 02:06 IST