नाशिक : येथील पंचायत समितीतील कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने केलेली आत्महत्त्या आणि त्याअनुषंगाने सापडलेल्या चिठ्ठीबाबतच्या चर्चेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.दरम्यान, यासंदर्भात सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज करंजे यांनी या आत्महत्त्येबाबत अकस्मात मृत्यूची नोेंद असून, अशी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.पंचायत समितीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने सोमवारी राहत्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कामकाजाचा अनुभव असलेले संबंधित मयत कर्मचारी सद्यस्थितीत नाशिक तालुका पंचायत समितीत कार्यरत होते. नेहमीच हसतमुखाने कामकाज करणाऱ्या या कर्मचाऱ्याने अचानक आत्महत्त्या करण्यामागचे कारण जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. संबंधित कर्मचाऱ्याने आत्महत्त्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून संबंधित चिठ्ठीत आपल्याला होणारा त्रास व त्यामागचे कारण स्पष्ट केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात गेल्या दोन दिवसांपासून आहे. या चिठ्ठीत मानसिक त्रास होत असलेल्या संबंधित अधिकाऱ्याबाबत उल्लेख असल्याची चर्चा आहे; मात्र पोलिसांनी अशी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे सांगत याप्रकरणापासून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. यवतमाळ येथे निलंबनाची धमकी दिल्याने शाळेतच शिक्षकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची नुकतीच एक घटना घडली असून त्यामुळे शिक्षक संघटनांनी या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आता नाशिकच्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात या आत्महत्त्येबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी)
कर्मचारी आत्महत्त्येमुळे अधिकारी अडचणीत?
By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST