याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश जगन्नाथ मंडलिक (वय ३०) हा नगरपरिषदेत पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहे. त्याने नगरपरिषद कार्यालयात जाऊन आतून गेट लावून घेत स्वतः ला कोंडून घेतले. यानंतर कर्मचारी कामावर हजर होण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच तात्काळ मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी व पोलीस निरीक्षक अशोक रहाटे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिनेश यास समजून सांगितले असता दिनेश स्वतः बाहेर आला. दिनेशचे वडील जगन्नाथ गोविंद मंडलिक हे देखील ग्रामपंचायत कर्मचारी होते. ३० मार्च २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले तर १० एप्रिल २०२१ रोजी त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांची ग्रॅज्युटी आणि अर्जित रजेची रक्कम मिळावी यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरापासून तर पालकमंत्री यांच्यापर्यंत अर्ज करूनदेखील आतापर्यंत ती रक्कम मिळाली नसल्याने प्रशासनाने आपल्या अर्जाची दखल घ्यावी व रक्कम मिळून देत न्याय द्यावा यासाठी स्वतःला कोंडून घेत आत्मदहनाचा इशारा दिला. यावेळी मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी व पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी दिनेशचा जबाब नोंद केला व मंडळ अधिकारी कुलकर्णी यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून घडलेल्या घटनेचा अहवाल वरिष्ठांना कळवला आहे.
कोट...
माझे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांना त्यांची ग्रॅज्युटी व इतर रक्कम मिळाली आहे. तरी अजून माझ्या वडिलांची रक्कम मिळाली नाही. माझे आई वडील व भाऊ यांचे निधन झाले आहे. माझा गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. यामुळे मी कर्जबाजारी देखील झालो आहे, प्रशासनाने माझा जास्त अंत न पाहता मला माझ्या हक्काची वडिलांची ग्रॅज्युटी व अर्जित रजेची रक्कम तत्काळ द्यावी.
- दिनेश मंडलिक, कर्मचारी ओझर नगरपरिषद