गोविंद नगर : बाजारपेठेतील निर्बंध शिथिल झालेले असतानाच पावसाळाही सुरू झाल्याने निसर्ग प्रेमी नागरिकांची पावले रोपवाटिकेकडे वळली. यात विविध फुलांच्या रोपांसह ऑरगॅनिक भाजीपाला, औषधी झाडे याबरोबर ऑक्सिजन देणारी रोपे खरेदी करण्याचा कल वाढला आहे.
निर्बंधाच्या कालावधीत अनेक निसर्गप्रेमींनी घरी असताना टेरेस गार्डन तयार करून ठेवले होते. तसेच अनेकांनी बंगला आणि साेसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात ऑरगॅनिक भाजीपाला घेण्याबरोबरच जास्त ऑक्सिजन देणारी झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे अशी अनेक रोपे नेटवर शोधून काढली होती. त्याप्रमाणे त्यांच्या जवळ आसलेल्या रोपवाटिकेतून ती आधीच मागणी नोंदवून ठेवली होती. पावसाळा सुरू होताच रोपवाटिकेतून ही रोपे विकत घेताना लगबग दिसू लागली. परिसरातील बिल्डिंगमधील रहिवाशांनी समूहातून तर काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामूहिक वृक्षारोपण केले. रंगीबेरंगी फुलांबरोबर भाजीपाल्याच्या रोपांची मागणी वाढली. एरव्ही फुलझाडांच्या सुबक नक्षीकाम केलेल्या कुंड्यांचे दर वाढून देखील मोठ्या प्रमाणावर ती खरेदी केली जात आहे. बांबू, मनीप्लांट, गुलाब, मोगरा, जास्वंद, जमिया, तुळस, जिवामृत इन्सुलिन कापुराचे झाड, शतावरी तसेच काही फळ झाडे घेण्याकडे कल वाढला आहे.
कोट --
लॉकडाऊन काळात निसर्गप्रेमी नशिककरांनी झाडांचे प्रेम जोपासले. वर्क फ्रॉम होममध्ये त्यांनी सेंद्रिय भाजीपाला घेत इंटरनेटवर ऑक्सिजन वाढीसाठी आवश्यक झाडे शोधली आणि ती जोपासली. आता नागरिक गोब्याग, नारळाचा भुसा, कोकोपीटआणि वेगवेगळ्या नक्षीकाम केलेल्या कुंड्या मोठया प्रमाणावर खरेदी करीत आहेत.
- सागर मोटकरी, नर्सरी मालक, गोविंद नगर