नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शहरातील वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे नियोजन करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला असला तरी शहरवासीय मात्र खंडित वीजपुरवठ्याने हैराण झाले आहेत. कुणी पावसाचे निमित्त करीत आहे, तर काही अभियंते सिंंहस्थ कुंभमेळ्याचे कारण पुढे करीत सर्व लाइनस्टाफ सिंहस्थ कामात अडकले असल्याचे सांगत आहेत. सलग वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी असतानाही गेल्या महिनाभरापासून नाशिककर खंडित वीजपुरवठ्याचा अनुभव घेत आहेत. गेल्या एप्रिल-मेमध्ये पाण्याअभावी राज्यातील काही विद्युत निर्मिती संच बंद झाल्याने तातडीचे भारनियमन करण्यात आले होते. शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनी पंधरादिवस महावितरणला या काळात सहकार्य केले होते, परंतु गेल्या जुलैपासून कोणतेही भारनियमन नसताना आणि पावसाळापूर्व सर्व दुरुस्तीची कामे झालेली असतानाही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. एव्हढे सगळे होऊनही महावितरणचे अभियंते मात्र असा कोणताही प्रकार होत नसल्याचे सांगत आहेत. परंतु दिवसातून अनेकदा वीजप्रवाह खंडित होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या संदर्भात ज्या अभियंत्यांशी संपर्क होऊ शकला त्यांनीही वीजप्रवास सुरळीत असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता, असे सांगितले. मात्र महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याबाबत त्यांनी कानावर हात ठेवले. (प्रतिनिधी)
शहरात विजेचा खेळखंडोबा
By admin | Updated: September 14, 2015 23:42 IST