नाशिक : शहरात सर्वत्र रामनवमीचा उत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिकरीत्या धार्मिक कार्यक्रमावर बंदी असली तरी रामभक्तांनी घराघरात रामनवमीची तयारी केली आहे. उपनगरामधील विविध राममंदिरांसह सोसायट्यांमधील मंदिरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
---
वीकेंडनंतर पुन्हा रस्त्यावर गर्दी
नाशिक : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शनिवारी व रविवारी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परंतु, वीकेंडनंतर सोमवारी पुन्हा शहरातील रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना अशा विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी लागली.
---
जुन्या वाहनांनी व्यापला रस्ता
नाशिक : द्वारका ते मुंबईनाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात जुनाट वाहने उभी असतात. या वाहनांनी रस्ता व्यापला जात असल्याने परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडचण होत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
---
इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव
नाशिक : इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडाव सुरू आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे घरूनच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थांच्या ऑनलाईन शिक्षणातही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून विद्युत पुरवठा विभागाने नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
---
मृत्यू प्रमाणपत्रासाठी नातेवाईकांची वणवण
नाशिक : शहरातील रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारासाठी जिल्हाभरातून रुग्ण दाखल होतात. यातील काही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालय, स्मशानभूमी व जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे मृत्यू प्रमाणपत्रात नाव, पत्ता यात तांत्रिक चुका राहत असल्याने नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.