नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणूक आखाड्यातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यपूर्ण घटना घडून राजी-नाराजी व मनधरणीचे प्रयोग करण्यात आले. परिणामी रिंगणातून माघार घेणाऱ्यांनी सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेत, त्यातून आपली आगामी राजकीय गणितेही साध्य करून घेतल्याने सोमवारी या निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट होऊन अकरा जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी त्र्यंबकेश्वर गटातून आमदार अपूर्व हिरे यांनी माघार घेतल्याने परवेज कोकणी यांनी हॅट््ट्रिक साधली, तर मालेगावमधून मधुकर हिरे यांनीही माघार घेतल्याने अद्वय हिरे, तर चांदवडमधून शिरीष कोतवाल व देवळ्यातून केदा अहेर हे चौघे बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बॅँकेबाहेर फटाके व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीच पाच जागा बिनविरोध निवडून आल्याने येत्या १९ मे रोजी फक्त सोसायटी गटातील निफाड, नाशिक, सिन्नर, नांदगाव व कळवण या पाच व राखीव सहा जागांसाठीच मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या २१ जागांसाठी ११५ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील काहींनी वेगवेगळ्या गटातून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने बॅँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यात काहींनी फक्त दबावासाठी अर्ज दाखल केले असल्याचे नंतर स्पष्ट झाले. निवडणुकीतून माघार घेण्याचा कालावधी अधिक असल्यामुळे कोण माघार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी माघारीचा अंतिम दिवस असल्यामुळे सकाळी अकरा वाजेपासूनच बॅँकेचे आजी-माजी संचालक, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह हजेरी लावून राजकारणाचे फड रंगविले. साधारणत: ३ वाजता मुदत संपुष्टात येताच, या रिंगणातून ७४ जणांनी माघार घेतल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
जिल्हा बॅँकेच्या अकरा जागांसाठी निवडणूक
By admin | Updated: May 12, 2015 00:48 IST