महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा सोमवारी (दि. ३१) महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला २ हजार ७६३ कोटी रुपयांचा स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी सादर केलेला अर्थसंकल्प दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. यावेळी महापालिकेची निवडणूक अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर आल्याने प्रत्येक प्रभागात पाच कोटी याप्रमाणे १६५ कोटी रुपयांच्या कामांची यादी तयार असून, या सर्व कामांचे इस्टिमेंट तयार करून एक महिन्याच्या आत निविदा काढण्याचा निर्णयदेखील महापौरांनी घोषित केला.
स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे २ हजार ७६३ कोटी रुपयांचे जमा, तर २ हजार ७५९ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाचे, तसेच ३ कोटी ८३ लाख रुपयांची शिलकी रक्कम असलेले अंदाजपत्रक महापौर सतीश कुलकर्णी यांना सोमवारी सादर केले. यावेळी कोणतीही दरवाढ नसल्याचे सांगताना त्यांनी विविध प्रस्तावित याेजनांची माहिती दिली.
ऑनलाईन सभा असल्याने मोजक्याच नगरसेवकांनी मार्मिक मु्द्दे मांडले. भाजपचे संभाजी मोरुस्कर यांनी गेल्या वर्षी अंदाजपत्रकात नाशिकरोड येथील जयभवानी रोडवर जलकुंभ मंजूर करून निविदा काढण्यात आल्या. त्या मंजूरही झाल्या; परंतु ऐनवेळी कोरोनाचे कारण करून वर्कऑर्डर थांबविण्यात आली. असे असेल तर कामे मंजुरीचा उपयोग काय असा प्रश्न त्यांनी केला. गुरुमित बग्गा यांनी महापालिका अधिनियमानुसार अंदाजपत्रकासमवेत परिवहन समितीचे अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक आहे; परंतु तसे न केल्याने या अंदाजपत्रकाच्या वैधतेविषयीच शंका उपस्थित केली. तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे अंदाजपत्रकदेखील याच महासभेत सादर करण्याची गरज असल्याचे सांगितले. घरपट्टीतच पाणीपट्टी लागू करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. सुधाकर बडगुजर यांनी एकीकडे तरतूद असूनही प्रशासन उड्डाण पुलाचे काम थांबविते आणि दुसरीकडे मात्र भूसंपादनासाठी मंजूर तरतुदीपेक्षा अधिक खर्च करण्यास प्रशासन कसे काय तयार होते, असा प्रश्न त्यांनी केला, तर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महासभेत मंजूर होऊन कामे हेाणार आहेत काय, असा प्रश्न केला. विलास शिंदे यांनी सिडको-सातपूरसाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर करण्याची मागणी करतानाच मंजूर रखडलेली कामे त्वरित करावी, अशी मागणी केली.
इन्फो...
अर्थसंकल्पात विशेष
- पंचवटी विभागातील म्हसरूळ येथे खुल्या जागेत उद्यान
- शरदचंद्र पवार मार्केटवर पेठरोड, तसेच दिंडोरी नाका येथे उड्डाणपूल
- सिडको, सातपूर आणि पंचवटीत शंभर खाटांची रुग्णालये
- मनपा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्लांटसाठी बारा कोटी
- मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक लॅबरोटरी सुरू करणार
- पथदिपांसाठी १७ काेटी ३० लाखांची तरतूद
--इन्फो...
निवडणुकीसाठी मोजकेच काही महिने शिल्लक असल्याने निधी उपलब्धतेसाठी विविध घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर दारणा धरणातून पाणी उचलता येत नसल्याने गंगापूर धरणातून तीनशे दशलक्ष घनफूट आरक्षण मिळावे, असाही ठराव करण्यात आला आहे.
- सतीश कुलकर्णी, महापौर