सात नगरपरिषदांना निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:56 PM2021-11-28T20:56:32+5:302021-11-28T20:56:32+5:30

नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोविडच्या नवीन व्हेरीएंटच्या शक्यतेने या निवडणुका लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात असली तरी मार्च २०२२ अखेर या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यताही चर्चिली जात आहे.

Election to seven Municipal Councils | सात नगरपरिषदांना निवडणुकीचे वेध

सात नगरपरिषदांना निवडणुकीचे वेध

Next
ठळक मुद्देडिसेंबरमध्ये मुदत संपणार : मार्च २०२२ अखेर बिगुल वाजण्याची शक्यता

नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोविडच्या नवीन व्हेरीएंटच्या शक्यतेने या निवडणुका लांबणीवर पडण्याची भीतीही व्यक्त केली जात असली तरी मार्च २०२२ अखेर या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यताही चर्चिली जात आहे.

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा या नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार असून त्यासाठी या पाचही ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे. येत्या ३० नोव्हेंबरला या नगरपंचायतीसाठी अधिसूचना जारी होईल. त्यानंतर १ डिसेंबर २०२१ पासून अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल. या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झालेल्या असतानाच यापूर्वी मुदत संपलेल्या चांदवड आणि दिंडोरी आणि येत्या डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या नांदगाव, सिन्नर, सटाणा, मनमाड व येवला या नगरपरिषदांनाही निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या केवळ प्रारुप प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून दिले आहेत. याबाबतचा अहवाल पाठविण्याची मुदत ३० नोव्हेंबर आहे. १ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून किमान पंधरा दिवस तरी मतदार याद्या प्रभागनिहाय फोडण्याचे काम चालणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागवल्यानंतर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. दरम्यान, आरक्षण टाकण्याची प्रक्रिया याच कालावधीत होणार आहे. यासाठी किमान निम्मा फेब्रुवारी महिना संपणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञाकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.

मनमाड नगरपरिषद
मुदत : २९ डिसेंबर २०२१
सदस्यसंख्या : ३१
नगराध्यक्ष : शिवसेना

नांदगाव नगरपरिषद
मुदत : २९ डिसेंबर २०२१
सदस्यसंख्या : १७
नगराध्यक्ष : शिवसेना

सिन्नर नगरपरिषद
मुदत : २४ डिसेंबर २०२१
सदस्यसंख्या - २८
नगराध्यक्ष : शिवसेना

चांदवड नगरपरिषद
मुदत : नोव्हेंबर २०२०
सदस्यसंख्या : १७
नगराध्यक्ष : काँग्रेस

दिंडोरी नगरपरिषद
मुदत : २९ फेब्रुवारी २०२०
सदस्यसंख्या : १७
नगराध्यक्ष : राष्ट्रवादी

सटाणा नगरपरिषद
मुदत : २९ डिसेंबर २०२१
सदस्यसंख्या : २१
नगराध्यक्ष : शहर विकास आघाडी

येवला नगरपरिषद
मुदत : १७ डिसेंबर २०२१
सदस्यसंख्या : २४
नगराध्यक्ष : भाजपा

प्रभागांचा आकार बदलणार
गत मागील पंचवार्षिक नगर परिषद निवडणुकीत दोन नगरसेवकांचा प्रभाग होता. त्यामुळे आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत जैसे थे परिस्थिती राहणार आहे. मात्र प्रभागाच्या भौगोलिक सीमा काहीअंशी बदलण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अनेक प्रभागांचे आकार कमी-जास्त होण्याची शक्यता असून दोन ते तीन नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे.

त्र्यंबक, इगतपुरी नगरपंचायतला वर्षभराचा कालावधी
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची मुदत १७ डिसेंबर २०२२ तर इगतपुरी नगरपरिषदेची मुदत १६ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. याठिकाणी अजून वर्षभराचा कालावधी बाकी आहे; मात्र आतापासूनच या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुकांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांच्या निवडणुकांवरही याठिकाणची राजकीय स्थिती अवलंबून असणार आहे.

Web Title: Election to seven Municipal Councils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.