नाशिक : नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत प्रचार यंत्रणा राबविली. जिल्ह्यातील ५८९५पैकी १६२२ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित जागांसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कळवण २९, येवला ६९, इगतपुरी ८, दिंडोरी ६०, त्र्यंबकेश्वर ३, सिन्नर १००, निफाड ६५, बागलाण ४०, चांदवड ५३, देवळा ११, नांदगाव ५९, मालेगाव ९९, नाशिक २५ या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २१३२ प्रभागात होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी सायंकाळी प्रचार संपुष्टात येताच दुसऱ्या दिवशी निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत.
दिनांक ४ जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेठी घेण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आश्वासनांचीही खैरात करण्यात आली. काही गावांमध्ये पक्षीय राजकारणाचेदेखील पडसाद दिसून आले. यंदा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले. मात्र, उमेदवारी कायम राखणाऱ्या उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. पावसाचा व्यत्यय आणि उर्वरित एका दिवसात प्रचार आणखी शिगेला पोहोचण्याची तसेच शक्तिप्रदर्शनाची तयारी उमेदवारांनी केलेली आहे.
--इन्फो--
प्रशासकीय तयारी
येत्या १५ तारखेला मतदान होणार असल्याने मतदानाच्या एक दिवस आधी मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यानुसार तालुका पातळीवर कर्मचारी तसेच त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे नियोजन करण्यात आले. केंद्रांवर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचतील. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील १९३३ मतदान केंद्रांवर सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.