नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुण्याकडून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक-सिन्नर रस्त्यावरील मोह व चिंचोली येथे आठ निवारा शेड उभारण्यात येणार असून, या ठिकाणी वाहनतळाचीही सोय राहणार आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशीही कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. मोह येथे १६ हजार हेक्टर क्षेत्रात २ निवारा शेड असून, वाहनतळाची क्षमता साडेतीन हजार इतकी आहे. या ठिकाणी ४० शौचालये, तीन स्टॉल, दोन पाण्याच्या टाक्या ठेवण्यात येणार आहे. दोन्ही वाहनतळांवर भाविकांसाठी क्लॉक रूमची व्यवस्था तसेच रात्री विद्युत व्यवस्था असणार आहे. या नंतर अधिकाऱ्यांनी सिन्नर फाटा अंतर्गंत बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, सैलानी बाबा चौक, दसक, मानूर आदि विविध भागांना भेटी देऊन भाविकांच्या मार्गावरील सुविधांविषयी चर्चा केली. दुपारनंतर पेठरोडवरील वाहनतळाची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंके, एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापक एम. एस. बंड आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुण्याकडील भाविकांसाठी उभारणार आठ निवारा शेड
By admin | Updated: July 23, 2015 00:32 IST