मालेगाव : तालुक्यातील सायने परिसरात असलेल्या गिरणा वाढीव पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीतून पाणीगळती थांबविण्यासाठी पांढऱ्या गोण्यांचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे वाटसरूंची करमणूक होत आहे. येथील मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा वाढीव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी सायने परिसरात सडली आहे. यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीगळती थांबवावी याविषयी ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले होते. यात जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर उपाययोजना म्हणून या ठिकाणी पांढऱ्या प्लॅस्टिकच्या गोण्या किंवा पोतडे लावण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून ही पाणीगळती दिसत नाही. ही पाणी गळती कोणी झाकली, हा संशोधनाचा विषय आहे. या प्रकरणाची चर्चा रंगली असून, रस्त्याने जा-ये करणारे प्रवासी हा अजब प्रकार पाहण्यासाठी थांबत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठा योजनेची पाणी गळती थांबविण्याचा प्रयत्न
By admin | Updated: September 14, 2015 22:33 IST