नाशिक : तपोवन परिसरातील गोदावरी-कपिला संगमाच्या पलीकडील सुमारे १६९ एकर शेतजमीन शासनाकडून आगामी सिंहस्थ कुं भमेळ्यासाठी भाडेपट्ट्यावर संपादित केली जाणार असून, याबाबत संबंधित परिसरातील शेतकऱ्यांना तहसीलदारांकडून नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत; मात्र शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला असून, रब्बी पिकांच्या उत्पादनाचाही शासनाने विचार करावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. चौदा महिन्यांकरिता शासनाकडून मौजे तपोवनातील जागा संपादित करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने हालचाली गतिमान केल्या असून, काही शेतजमिनींवर बुलडोजर फिरवून मुरूम टाकून सपाटीकरणदेखील केले आहे. गोदावरी-कपिला संगमाच्या पुढील शेतजमिनी भाडेपट्ट्यावर संपादित करण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. भाडेपट्ट्यावर शासन तात्पुरत्या स्वरूपात जमीन संपादित जरी करत असले, तरी या जमिनीत पुढील तीन वर्षे कोणतेही उत्पादन घेणे शक्य होणार नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सध्या हाताशी असलेल्या रब्बी पिकांचे उत्पादनही भूसंपादनामुळे धोक्यात येणार असल्यामुळे उपासमारीचे संकट आमच्यासमोर असल्याचे दामोदर जेजूरकर, रामदास जेजूरकर, लक्ष्मण चौधरी, शंकर कोठुळे यांनी सांगितले. शासनाने शेतजमिनी कायमस्वरूपी संपादित कराव्यात अन्यथा करू नये, कारण चौदा महिन्यांनंतर जमीन पूर्णत: नापीक होणार असल्याने त्यामध्ये उत्पादन घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे उपासमारीची टांगती तलवार शेतकऱ्यांवर राहणार आहे. (प्रतिनिधी)
आगामी सिंहस्थ कुं भमेळ्यासाठी भाडेपट्ट्यावर संपादित
By admin | Updated: November 17, 2014 01:20 IST