वटार : येथे सोमवारी सकाळी ९ वाजता वीजप्रवाह सुरू झाल्याने रोहित्राच्या चिमणीचा स्फोट होऊन जमिनीत प्रवाह उतरल्याने जवळच बांधलेल्या म्हशीचा मृत्यू झाला. येथील शेतकरी सुदाम राघो गांगुर्डे यांच्या घराजवळील निवाराशेडजवळ विंचुरे शिवारातील रोहित्राचा वीजप्रवाह सुरू झाल्याने स्फोट झाला. यात अंदाजे ८० हजारांच्या आसपास किंमत असलेली जाफराबादी म्हैस जागीच ठार झाली. मात्र जवळच बांधलेले बैल सुदैवाने वाचले. घटनेची माहिती शेतकऱ्याने तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस स्टेशनला भ्रमध्वनीद्वारे कळविल्यानंतर सर्व अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर घटनेची पाहणी करून विजेचा शॉक लागूनच म्हशीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सटाणा पो. स्टेशनचे जी. टी. भोये यांनी पंचनामा केला. यावेळी दादाजी खैरनार, पोपट गांगुर्डे, चेतन गांगुर्डे, महिपत गांगुर्डे, सुदाम गांगुर्डे, संपत गांगुर्डे, तुकाराम गांगुर्डे, निंबा गांगुर्डे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
जमिनीवर उतरलेल्या विजेच्या धक्क्याने म्हैस ठार
By admin | Updated: October 12, 2015 22:00 IST