सटाणा : देशात नाशिकची ओळख द्राक्षपंढरी म्हणून आहे. मात्र याच जिल्ह्यातील खान्देशचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कसमादे’ पट्ट्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे लवकर उत्पादन घेण्यात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे हा परिसर देशात द्राक्षांचे अर्ली उत्पादन घेण्यात एकमेव ठिकाण ठरले आहे. या अर्ली द्राक्ष हंगामाच्या छाटण्या पूर्ण होत असल्या असून, सुमारे साडेतीनशे एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा बहरू लागल्या आहेत.द्राक्षाचे शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, सिन्नर व चांदवड या तालुक्यांमध्ये द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या भागातील द्राक्ष बहारासाठी आॅक्टोबर महिन्यात बागांची छाटणी सुरू होते. फेब्रुवारी महिन्यापासून द्राक्ष काढणीला येतात. मात्र बागलाण, मालेगाव, देवळा आणि कळवण या पट्ट्यातील भौगोलिक रचना आणि हवामान हे फळबागांसाठी अनुकूल आहे. याचाच फायदा घेत या भागातील प्रयोगशील शेतकरी नाशिकपेक्षा पाच महिने आधी म्हणजेच जून महिन्यात अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी छाटणी करतात. हा प्रयोग गेल्या चौदा वर्षांपासून शेतकरी यशस्वीपणे राबवत आहे. त्यामुळे हा पट्टा अर्ली द्राक्ष उत्पादन घेण्यात देशात एकमेव ठरला आहे. यंदा हंगामासाठी छाटणी प्रक्रिया संपली असून, कळ्या फुलून द्राक्षबागा बहरू लागल्या आहेत...असा असतो अर्ली हंगामद्राक्षांच्या विविध जातींचे वाण असून, या भागात सोनाका, थॉमसन, शरद, जम्बो, माणिकचमण, नानासाहेब, परपल, क्लोन-२, ताजगणेश या द्राक्ष जातीचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षाच्या अर्ली बहार घेण्यासाठी १५ जून ते १५ जुलैदरम्यान बागांची छाटणी केली जाते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष काढणीला येतात. हा अर्ली हंगाम १५ डिसेंबरपर्यंत सुरू असतो आणि एकरी १० ते ११ टन उत्पादन येते.येथे घेतले जाते उत्पादनकसमादे पट्ट्यातील सटाणा, चौगाव, कऱ्हे, ब्राह्मणगाव, किकवारी, डोंगरेज, विंचुरे, तळवाडे दिगर, दसाणे, केरसाने, मुंगसे, पिंगळवाडे, भुयाणे, करंजाड, निताणे, बिजोटे, लाडुद, जायखेडा, आनंदपूर, गोराणे, अंबासन, इजमाने, बिजोरसे, नामपूर, आसखेडा, वाघळे, जायखेडा, तांदुळवाडी, मालेगाव तालुक्यात दाभाडी, पिंपळगाव, आघार, यसगाव, देवळा तालुक्यातील देवळा, लोहोणेर, सटवाईवाडी, विठेवाडी, भऊर, खामखेडा, खर्डे तसेच कळवण तालुक्यातील कळवण, बेज, मानूर परिसरात अर्ली द्राक्षाचे सुमारे साडेतीनशे एकरवर उत्पादन घेतले जाते. (वार्ताहर)
‘कसमादे’ परिसरात अर्ली द्राक्षांना बहर
By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST