नाशिक : द्वारका चौफुली ते शालिमार अंतर किती अवघे दोन ते तीन किलोमीटर. एरव्ही या अंतरासाठी दहा रुपये शेअर रिक्षातून आकारणाऱ्या रिक्षाचालकांनी मंगळवारी दोनशे रुपये भाडे आकारून अक्षरश: लूट केली. त्यांना ही लुटीची संधी राष्ट्रवादीच्या चक्काजाम आंदोलनामुळेच मिळाली.दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने नाशिक शहरात तीन ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पैकी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे महत्त्वाचे ठिकाण द्वारका चौफुली होते. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या चौकात अगोदरच कोणतीही अडचण नसली तरी वाहतूक कोंडी होतच असते. मंगळवारी तर रास्ता रोको होणार असल्याने पोलिसांनी अगोदरच कडे केलेले, त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. हीच संधी साधत रिक्षाचालकांनी लूट केली. नाशिकरोडकडून द्वारकाकडे येताना जरा मार्ग बदलण्यासाठी जर अन्य गल्लीबोळातून आणण्यासाठी रिक्षाचालकाने आपले कसब सिद्ध करण्यासाठी चक्क दोनशे रुपयांची मागणी केली. आंदोलन भलेही लोकांच्या विषयाशी संबंधित असो, परंतु त्यासाठी लोकांचीच अडवणूक करून काय उपयोग अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
द्वारका ते शालिमार दोनशे रुपये रिक्षाभाडे
By admin | Updated: September 15, 2015 23:54 IST