नाशिक : ज्यांना समाजानं नाकारलं त्यांना बाबा आमटे यांनी स्वीकारलं. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास बाबांनी घेतला. याच कुष्ठपीडितांच्या फौजफाट्याच्या बळावर एका खडकाळ भागात बाबांनी आनंदवन उभे केले. सध्या आनंदवनात दूरवर केवळ हिरवाईचे कोंदण दिसते आणि मुबलक पाणीसुद्धा. हे केवळ शक्य झाले ते जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळेच. आज कुष्ठरोगी या पाण्यावरच आनंदवनात शेती फुलवित आहे. हे भारतातील पहिले स्मार्ट खेडे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरामधील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले. जागतिक प्लंबिंग दिनाच्या निमित्ताने ‘जलसंवर्धन’ विषयावर इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी वास्तुविशारद, अभियंता, बांधकाम व्यावसायिक, जलसंवर्धन विषयाचे अभ्यासक उपस्थित होते. प्रारंभी कौस्तुभ आमटे यांनी दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून आनंदवन, सोमनाथमधील जलसंवर्धनाची झालेली कामे आणि त्यामुळे परिसराचे पालटलेले रूप यावर प्रकाशझोत टाकणारी चित्रफीत सादर केली. आमटे यांनी यावेळी जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले, बाबा आमटे यांनी सर्वप्रथम ‘एन्व्हायरॉन्मेट’ हा शब्द शब्दकोशामधून बाहेर काढला. बाबांना पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामामुळे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. शेती फुलवायची असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही हे बाबांना ठाऊक होते म्हणून आनंदवनाच्या खडकाळ प्रदेशात बाबांनी पहिली विहीर खोदण्यास सुरुवात केली. सतत ४५ दिवस कष्ट उपसल्यानंतर त्यांना सोळा फुटांवर पाण्याची चिन्हे दिसली. पाण्याच्या ओलाव्यामुळे माशा आणि फुलपाखरू त्या खड्ड्याभोवती घोंगवू लागले होते. दोन दिवसांनंतर खड्ड्यात चांगल्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले, हे चित्र बाबा व त्यांच्या त्या सहा कुष्ठपीडित सहकाऱ्यांसाठी समाधानकारक होते. असोसिएशनच्या वतीने मिलिंद शेटे यांनी आमटे पिता-पुत्रांचे स्वागत केले.
जलसंधारणमुळे आनंदवन बनले स्मार्ट
By admin | Updated: March 11, 2017 23:20 IST