नाशिक : उठता-बसता डासांचा कमालीचा वाढलेला उपद्रव, टाकळी मलनिस्सारण केंद्रातून येणारी दुर्गंधी यामुळे हैराण झालेल्या प्रभाग क्रमांक ३१ व ३७ मधील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक मोर्चा नेला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी गोदापात्रातील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बंधारा फोडण्याची मागणी करणारे पत्र पाटबंधारे विभागाला देण्याचे मान्य केले. गोदावरी व नासर्डीपात्रानजीकच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांनी उच्छाद मांडलेला आहे. नदीपात्रात वाहते पाणी नसल्याने साचलेल्या पाण्यामध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. रात्रीची झोपही या डासांनी उडविली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. डासांच्या या उपद्रवाबद्दल स्थानिक नगरसेवकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु तात्पुरत्या उपाययोजनांपलीकडे काहीही झाले नाही. आयुक्तांनीही पाहणी दौरा करून उपाययोजनेचे आश्वासन दिले होते, परंतु त्याचीही पूर्तता झाली नाही. अखेर नागरिकांचा संयम सुटला आणि सोमवारी दोन्ही प्रभागांतील नागरिकांनी नगरसेवक मेघा साळवे, सुमन ओहोळ, विजय ओहोळ, नितीन साळवे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या राजीव गांधी भवनवर धडक मारली. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती सलीम शेखही उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनाही नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी धारेवर धरले. गोदावरी पात्रात महालक्ष्मी नाल्याजवळ तसेच पुलाच्या पलीकडे बंधाऱ्यांमुळे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळे सदर बंधारे फोडण्याची सूचना नगरसेवकांनी केली. अतिरिक्त आयुक्तांनी नदीपात्रातील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बंधारे फोडण्याची परवानगी मागणारे पत्र पाटबंधारे खात्याला पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
डासांपासून मुक्तीसाठी मनपावर धडक
By admin | Updated: April 12, 2016 00:09 IST