नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होणार आहे. परंतु, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त होत आहे. दरम्यान, असंख्य मतदारांना त्यांच्या निवासापासून दूर अंतरावर मतदान केंद्रावर मतदानाला जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यातच मतदान केंद्र हे मतदाराच्या निवासापासून दोन किमीच्या परिघात असावे, असा नियम असताना असंख्य मतदारांना दूर अंतरावर मतदान केंद्रावर पायपीट करत मतदानासाठी जावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या बाबतीत त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून त्याचाही परिणाम मतांच्या टक्केवारीवर होण्याची भीती आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. परंतु, सदर मतदान चिठ्ठ्या अनेकांना प्राप्त झाल्या नसल्याच्याही तक्रारी आहेत. याशिवाय, महापालिकेने मतदाराचे नाव व केंद्र शोधण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली सुविधाही कुचकामी ठरली आहे. त्यात मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने आयोगाने टाइप केल्याने अनेकांना या सुविधेचा लाभ न होता मनस्तापच झाला. उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठ्या पोहोचविल्या असल्या तरी त्यातही त्रुटी असल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. (प्रतिनिधी)
मतदार याद्यांमध्ये नावे सापडत नसल्याने घोळ
By admin | Updated: February 21, 2017 01:28 IST