सुरगाणा : तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या सोमवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपामुळे येथील रुग्णांचे हाल होत आहेत. वैद्यकीय अधिकार्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यामुळे डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्त्यार उपसले आहे.या आंदोलनामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांचे काम ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला सहन करावा लागत आहे. आदिवासी भागात उच्च शिक्षित खासगी वैद्यकीय अधिकारी रुग्ण सेवा देण्यास नाखूश असतात. जेमतेम सरकारी रुग्णालयावर रुग्णांना अवलंबून रहावे लागते. त्यामध्येच वैद्यकीय अधिकार्यांनी बेमुदत संपाचे हत्त्यार उपसल्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्याच्या गावी एकमेव ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे गावापासून ५० ते ६० कि.मी. अंतरावरून अपघात, श्वानदंश, सर्पदंश, भाजणे, आत्महत्त्या, मारामारी, पाण्यात बुडून मृत्यू आदि रुग्णांना येथे उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र काम बंद आंदोलनामुळे रुग्णांना परत जावे लागत आहे. शेतमजूर, कष्टकरी आदिवासींकडे उपचारासाठी पैसे नसल्याने खासगी उपचार घेऊ शकत नाही. आजार कित्येक दिवस अंगावर काढला जातो. सध्या अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे दूषित पाणी प्यायल्याने डायरिया, ग्रॅस्ट्रो, तापाचे रुग्ण दाखल होणेसाठी येतात. मात्र निराश होऊन त्यांना परत जावे लागते. या संपाचा फटका आदिवासी जनतेला बसत आहे. शासनाने तत्काळ लक्ष देऊन संप मिटवावा,अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांनी केले आहे. ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे खेडोपाडी व दुर्गम भागातून येणार्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. येथील काही डॉक्टरांचे यामुळे मात्र फावले आहे. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकार्यांच्या बेमुदत संपामुळे ग्रामीण रुग्णांचे हाल : प्रलंबित मागण्यांमुळे आंदोलन
By admin | Updated: June 3, 2014 01:42 IST