नायगाव : कांद्याच्या भावात सुरू असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आले असून, सर्वच शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टमाटे आदिंसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच शेतमालास उत्पादन खर्चही हाती पडण्याइतका दर कोणत्याच पिकातून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात ३५० ते ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकऱ्यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांद्याचा विषय कायमच चर्चिला जातो. मात्र, अनेकदा कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको हेऊनही शासन याकडे गांभीर्याने बघत नाही. कधीतरी कांदा भावात सुधारणा झालीत तर सर्व प्रसारमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या डोळ्यातून कांद्याचे काढलेले पाणी दाखवले जाते व शासनही अशावेळी तत्काळ याची दखल घेऊन बाजारभाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखते. कोणतेही शासन कधीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याचा आजपर्यंतचा उत्पादकांचा अनुभव आहे. सध्या सर्वच शेतमालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकरीवर्गात मोठी कोंडी निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संकटात
By admin | Updated: January 31, 2017 01:32 IST