नाशिक : मान्सूनच्या पावसाने शुक्रवारी शहराला हुलकावणी दिली. गुरुवारी पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्यानंतर नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र आज पावसाने पुन्हा दडी मारल्याने चिंतेत भर पडली आहे. जून महिन्यात मान्सून दाखल न झाल्याने शहरवासीय पावसाच्या प्रतीक्षेत होते. ‘नानौक’ वादळाचा अडथळा येऊन मान्सूनची प्रगती न झाल्याने मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. आर्द्रातही पाऊस झालेला नाही; मात्र त्याच्या शेवटच्या चरणात व पुढच्या पुनर्वसू नक्षत्रात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला होता. त्याला हवामान खात्यानेही दुजोरा दिला आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. ३) दुपारनंतर पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. पेठरोड येथील हवामान केंद्रात ०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या खऱ्या; मात्र शुक्रवारी पावसाने विश्रांतीच घेतली. (प्रतिनिधी)
पावसाची शहराला हुलकावणी
By admin | Updated: July 5, 2014 00:16 IST