नाशिक : कोरोनाच्या निर्बंधानंतर आता हॉटेल सुरू झाली असून, अनेक खवय्यांची पावल हॉटेलांकडे वळू लागली आहेत; पण पावसाळी वातावरण पाहता हॉटेल सुरू झाली म्हणून लगेचच जिभेचे लाड करू नका असा सल्ला आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते आणि याच काळात वातावरणात बॅक्टेरिया आणि वायरसेसचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे बाहेरच्या खाण्याने पोटाचे विकार जडण्याचा धोका असतो. पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावेत. शक्यतो घरचेच नाष्टा, जेवण घ्यावे यामुळे आपली प्रकृतीही उत्तम राहते आणि सकस अन्नही पोटात जात असल्याने आपला उत्साह टिकून राहत असतो, असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. रस्त्यावरील पदार्थ तयार करताना वापरलेले पाणी व्यवस्थित गाळलेले आणि उकळलेलेही नसते त्यामळे असे पदार्थ खाण्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. यासाठी पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे असे आहारतज्ज्ञांकडून सांगितले जाते.
चौकट-
पावसाळ्यात हे खायला हवे
पावसाळ्यात उकडलेले, उकळलेले आणि भाजलेले ताजे अन्न खावे.
घरचे वरण-भात, भाजी-पोळी यांचा जेवणात समावेश असावा.
सर्व प्रकारच्या फळभाज्या चांगल्या शिजवून खाणे चांगले असते.
चौकट-
पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे
बाहेरचे पिझ्झा, बर्गर, वडापाव, बेकरी पदार्थ आणि जंक फुड हे पदार्थ या दिवसात खाऊ नये. त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतरवेळी हिरव्या पालेभाज्या खाणे चांगले असले तरी पावसाळ्यात शक्यतो हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत कारण पाणांवर दूषित पाणी जमा होऊन त्यातून बॅक्टेरियाचा फैलाव होत असतो.
बटाटा, कोबी, फ्लॉवर, हिरवा वाटाणा, आदी वातुळ पदार्थ खाण्याचे टाळावे किंवा कमी खावेत.
पावसाळ्यात पोटाच्या विकाराबरोबरच अस्थमा, संधीवाताचे रुग्णही आढळतात. यामुळे वात वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत.
चौकट-
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळ्यामुळे अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. याच काळात वातावरणात बॅक्टेरिया आणि वायरसेस यांचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेले असते. रस्त्यावरील उघड्या पदार्थांवर बॅक्टेरियांचे प्रमाण अधिक असते. शिवाय हे पदार्थ बनविण्यासाठी वापरलेले पाणी बऱ्याचवेळा गाळलेले आणि उकळलेले नसते, त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊच नये.
चौकट-
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
कोट-
पावसाळ्यात आहारात कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे. शक्यतो घरचे वरण-भात, भाजी-पोळी यांचाच रोजच्या जेवणात समावेश करावा. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असल्याने आजार बळावण्याचा धोका अधिक असतो. यामुळे उघड्यावरचे आणि बाहेरचे अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे. - रश्मी सोमाणी, आहारतज्ज्ञ
कोट-
पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाणे टाळाव्यात कारण पाणांवर दूषित पाणी पडल्याने त्याचे लवकर इन्फेक्शन होऊन पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. याशिवाय पावसाळ्यात अगदी भरपेट जेवण्यापेक्षा नेहमीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी जेवण करावे. - डॉ. नीरज गुजराथी, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ, नाशिक.