नाशिक : देशातील जनतेने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी व कॉँग्रेस पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली असून, केंद्रात भाजपाला बहुमताने सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांचे जहाज बुडण्याच्या मार्गावर असून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी व मुस्लीम बांधवांचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी भाजपाच्या जहाजावर स्वार होऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीतदेखील स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता व माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले.नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ वडाळा नाका येथील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित सभेमध्ये शाहनवाज बोलत होते. ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ व आर. आर. पाटील यांच्या सत्तेत महाराष्ट्रात मुस्लिमांवर विशेषत: तरुणवर्गावर अत्याचार करण्यापलीकडे काहीही झाले नाही. मुस्लीम तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात दाखल करण्याचे काम कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्रात केले. तसेच याच सरकारच्या काळात राज्यात मोठ्या संख्येने जातीय दंगली घडवून आणल्या गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपा हा पक्ष, जात, धर्मावर राजकारण करणारा पक्ष नसून या देशावर जो प्रेम करतो भाजपा त्याला जवळ करतो. त्यामुळे मुस्लिमांनी कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन शाहनवाज यांनी यावेळी केले. दरम्यान, सभेला सुमारे साडेचार तास उशीर झाल्याने उपस्थितांचा गोंगाट त्यांच्या भाषणाला सुरुवात झाल्यानंतरही सुरूच होता. त्यांनी भाषणाला प्रारंभ करताच काही महिलांनी नाश्ता मिळाला नाही म्हणून आरडाओरड सुरू केल्याने शाहनवाज यांचा चेहराही पडला आणि अखेर त्यांनी उशीर होण्याचे कारण स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बुडणाऱ्या जहाजावर स्वार होऊ नका
By admin | Updated: October 14, 2014 01:21 IST