नाशिक : ‘आमच्या काळात असे नव्हते... आम्ही एवढा अभ्यास करायचो... आम्ही दहा रुपयांच्या मिसळीवर दिवस काढले’ वगैरे अशा भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका. त्यामुळे मुलांना तुमची सहानुभूती वाटण्याऐवजी कीवच वाटेल. मुलांसोबत वर्तमानात जगा आणि त्यांच्या भविष्यकाळाची स्वप्ने पाहा, असा सल्ला प्रख्यात बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी पालकांना दिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात तांबे यांनी ‘अभ्यास आणि वाचन’ तसेच ‘परीक्षेला सामोरे जाताना...’ या विषयावर आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पालकांनी भूतकाळ उगाळलेला मुलांना आवडत नाही. तो काळ संपलेला असतो आणि मुलांनी तो पाहिलेला नसतो. त्यात त्यांना अजिबात रस नसतो. आपली मुले हुशार आहेत, हे पालकांना माहीत नसते. ते त्यांच्या पाठीवर कधी शाबासकीची थाप देत नाहीत. सॉफ्टवेअरच्या भाषेत सांगायचे झाले तर पालक ‘विंडोज् ९५’मध्ये असतात आणि मुले ‘विंडोज ७’पर्यंत पोहोचलेली असतात. त्यामुळे पालकांनी ‘अपडेट’ होणे गरजेचे आहे. आपली वृत्ती बदलायची असेल, तर विचार बदलावे लागतील. विचार बदलायचे असतील, तर भाषा बदलावी लागेल आणि भाषा बदलायची असेल, तर ‘इनपुट्स’ बदलावे लागतील, असे तांबे म्हणाले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तन्वी देवडे यांनी परिचय करून दिला. डॉ. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. ‘माझं ग्रंथालय’च्या बाल विभागाच्या समन्वयक स्वाती गोरवाडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
भूतकाळातील आठवणी मुलांसमोर उगाळू नका.
By admin | Updated: March 9, 2015 01:18 IST