नाशिक : व्हॉट्स अप, फेसबुक, हाइक, वुई चॅट आदि सोशल मीडियावर दिवाळीचा उत्साह जाणवत असून, मेसेजिंग, इ-ग्रीटिंग्ज, अॅनिमेटेड ग्रीटिंग्ज व व्हिडीओजमधून शुभेच्छा आप्तेष्टांपर्यंत पोचवल्या जात आहेत. फेसबुक, ट्विटरवर औपचारिक शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी, व्हॉट्स अॅप, फेसबुकवर खास ‘दिवाळी मूड’ची आणि खरेदीची छायाचित्रे, रांगोळ्या-नक्षांची छायाचित्रे शेअर केली जात आहे. मनोरंजन व प्रबोधन असे दोन्हीही हेतू साध्य करत सोशल मीडियावर यंदाची दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. व्हॉट्स अॅपवर अनौपचारिक व विनोदी पद्धतीने शुभेच्छाही दिल्या जात आहेत. कोणी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे का?... अहो जरा लाइटच्या माळा लावायच्या होत्या घरी..!, ‘कोणी सिव्हिल इंजिनिअर आहे का?... किल्ला बांधून द्यायचा होता मुलांना! तसेच कोणी शास्त्रज्ज्ञ आहे का हो ग्रुपमध्ये?... रॉकेट पाहिजे होते जरा उडवायला !’ अशा पद्धतीचे विनोद ग्रुपवर झळकत होते. तसेच ग्रुप अॅडमिनला दिवाळी बक्षीस मागणाऱ्या पोस्ट्स फिरत होत्या. ‘देख अॅडमिन दिवाली का गिफ्ट घर पहुंचा देना, दोस्ती अपनी जगह है और गिफ्ट अपनी जगह...’ तर अॅडमिन साहेबांकडून बोनस मिळाला नाही, बोनस लवकर खात्यात जमा करा’ अशा सज्जड दम भरणाऱ्या पोस्ट्सही ग्रुपवर फिरत होत्या. त्याचबरोबर वसूबारसपासून ते भाऊबीजपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व विशद करणारे पोस्ट्सही एकमेकांना शेअर केले जात होते. (प्रतिनिधी)
मनोरंजन, जनजागृतीतून सोशल मीडियावर दिवाळी
By admin | Updated: November 11, 2015 23:11 IST