नाशिक : निवडणूक महापालिकेची असो अथवा लोकसभा-विधानसभेची, मतदानाच्या दिवशी बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते ती सामसूम. यंदा मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर विधानसभेसाठी मतदान घेण्यात आल्याने बाजारपेठा दुपारनंतर खुल्या झाल्या आणि दिवाळीच्या खरेदीसाठी एकच गर्दी लोटली. मेनरोडसह सर्वच बाजारपेठांमध्ये दिवाळीचा माहोल दिसून आला.विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाला मतदान करता यावे यासाठी शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. याशिवाय उद्योग-व्यापार यांसह अन्य खासगी आस्थापनांनाही सुटी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दुपारपर्यंत शहरातील बाजारपेठांमधील व्यवहार बंद होते. सकाळी बाजारपेठांमध्ये शांतता होती; मात्र दुपारी १ वाजेनंतर हळूहळू व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली आणि म्हणता म्हणता बाजारपेठा खरेदीदारांच्या गर्दीने ओसंडून वाहू लागल्या. येत्या सोमवारपासून दीपोत्सवास प्रारंभ होत आहे. अवघ्या तीन दिवसांवर दिवाळीचा उत्सव येऊन ठेपल्याने आणि मतदानासाठी शासनानेही सार्वजनिक सुटी जाहीर केल्याने मतदानाचा हक्क बजावतानाच सुटीची संधी साधत नागरिकांनी दिवाळी खरेदीचाही आनंद लुटला. सायंकाळी मेनरोड ही प्रमुख बाजारपेठ खरेदीदारांच्या गर्दीने गजबजली होती. मेनरोडवर मोठ्या संख्येने हॉकर्स आपली दुकाने थाटत असतात. त्यातच अनेकांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लागणारा माल भरून ठेवल्याने नुकसान होऊ नये म्हणून दुपारपासूनच दुकाने थाटली. सायंकाळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मेनरोडसह प्रमुख बाजारपेठा विद्युत रोषणाईने झळाळल्या होत्या. सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी)
निवडणुकीनंतर दिवाळीचा माहोल
By admin | Updated: October 17, 2014 00:09 IST