नाशिक : गेल्या काही वर्षांपासून भाडे तत्त्वावरील जागेत असलेल्या नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय स्वमालकीच्या जागेत लवकरच स्थलांतरित होणार असून येत्या सप्टेंबरपर्यंत यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.मंगळवारी (दि. २८) यासंदर्भात मंत्रालयात तावडे यांच्या कक्षात बैठक झाली. सहकार राज्यमंत्री दादा भुसे व आमदार सीमा हिरे यांनी याबाबत तावडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय सद्यस्थितीत वाणी हाऊस, द्वारका येथे भाडे तत्त्वावर सुरू आहे. दरवर्षी इमारत भाडेपोटी शिक्षण मंडळाचा अंदाजे ३७ लाख रुपये खर्च होतो. नाशिक महापालिका हद्दीतील आडगाव येथे सर्व्हे नं.१५६०/१ ही पाच एकर जागा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत २ आॅगस्ट २००१ रोजी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. १४ वर्षांपासून या जागेचा कब्जा घेऊनही तसेच इमारत बांधण्यासाठी वास्तुविशारद, तांत्रिक सल्लागार नेमून निविदा प्रक्रियाही गेल्या दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही राज्य मंडळामार्फत बांधकामाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची बाब सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास या बैठकीत आणून दिली. त्यामुळे याबाबतची आवश्यक ती कार्यवाही येत्या सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण मंडळाला दिले. या बैठकीस शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे, शिक्षण विभागाचे उपसचिव अनिल गुंजाळ, विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव राजेंद्रप्रसाद मारवाडी, नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रकाश आंधळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विभागीय शिक्षण मंडळाला मिळणार इमारत
By admin | Updated: July 30, 2015 00:23 IST