नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी साडेसात ते सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. मतदान केंद्रांची अदलाबदल झाल्याने अनेकांच्या नशिबी पायपीट आली. इतके असूनही मागील पंचवार्षिकमध्ये झालेले एकूण ६४.२३ टक्के मतदानाचा टप्पा यंदा पार होऊन सरासरी ६५ ते ६९ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.नाशिकसह बहुतांंश तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांच्या आवारात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत सहा तालुक्यांतील ७० मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. त्यात नाशिक तालुक्यात - ११, पेठ - ०७, दिंडोरी - १२, इगतपुरी - १४, सिन्नर - ११ व देवळा - १५ अशा एकूण ७० मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा कायम होत्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्णातील एकूण २४ लाख २६ हजार ७८१ मतदारांपैकी १२ लाख ४ हजार ८१७ (४९. ६५ टक्के)मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. अखेरच्या दोन तासांत या पंधरा पैकी सहा तालुक्यांत ७० ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा असल्याने उर्वरित तालुक्यांचा विचार करता सायंकाळपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा निश्चितच वाढेल, असे चित्र होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये गोंधळ
By admin | Updated: February 22, 2017 01:51 IST