नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी नवरात्रात होणारा शारदीय उत्सव अर्थात ४९ वा जिल्हा साहित्यिक मेळावा दि. १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षपदी क्रीडामानसोपचार तज्ज्ञ व ज्येष्ठ लेखक भीष्मराज बाम यांची निवड करण्यात आली असून, उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.मेळाव्याचा प्रारंभ शनिवार, दि. १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कविसंमेलनाने होईल. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी प्रा. शंकर बोऱ्हाडे भूषविणार असून, सूत्रसंचालन कवी संदीप जगताप करणार आहेत. रविवार, दि. २ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मेळाव्याचे उद्घाटक श्रीपाद जोशी यांचे ‘संमेलन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर मेळाव्याचे अध्यक्ष भीष्मराज बाम यांची मुलाखत वंदना अत्रे व प्रा. प्रणव रत्नपारखी घेणार आहेत. पुढे होणाऱ्या डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादाचे अध्यक्षस्थानही श्रीपाद जोशी भूषवतील. ‘साहित्य आणि कलांचे भाषिक आकलन’ या परिसंवादात लोकेश शेवडे, एकनाथ सातपूरकर, आनंद ढाकीफळे आणि लीना हुन्नरगीकर सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे समन्वयक किशोर पाठक असतील. भोजनोत्तर दुपारच्या सत्रात डॉ. अ. वा. वर्टी व कवी गोविंद काव्य स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा व लक्ष्मीबाई टिळक आणि कवयित्री जयश्री पाठक पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यानंतर अरुण इंगळे, राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर हे ‘माय-बाप एक कृतज्ञता’ हा कार्यक्रम सादर करतील. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सावानाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवारपासून
By admin | Updated: September 27, 2016 02:02 IST