नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला असून, आता यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात येत्या बुधवारी (दि.८) त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या सुनावणीनंतरच जिल्हा बॅँकेच्या अंतिम प्रारूप मतदार यादीची निश्चिती होऊन निवडणुकीचा कार्यक्रम त्यानंतर आठवडाभराने जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात नाशिक जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश मोहिते यांच्यासह नाशिकमधून तीन-चार, तसेच पुण्यातून एक अशा सर्व याचिका एकत्रित करून त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. त्यानुसार आधी एक दिवसासाठी व नंतर १ एप्रिलपर्यंत जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१) याबाबत सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीश रजेवर असल्याने याबाबत काल स्थगितीवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर याप्रकरणी काल सोमवारी (दि.६) सुनावणी होणार होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयासमोर याचिकेचे कामकाज सुनावणीसाठी येऊ शकले नाही. त्यामुळे आता याप्रकरणी येत्या बुधवारी (दि.८) सुनावणी होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
प्रारूप मतदार यादीवर बुधवारी सुनावणी शक्य जिल्हा बॅँक निवडणूक
By admin | Updated: April 7, 2015 01:48 IST