जिल्हा बँकेची कर्ज वसुली १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली असून, त्यासाठी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विभागीय अधिकाऱ्यांची वसुली बाबत बैठक घेऊन कर्जवसुलीसाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार, सभासदांवर कायदेशीर बाबीची पूर्तता करून थकबाकी वसुली सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदार सभासदांचे १०१ ची प्रकरणे दाखल करणे, वसुलीबाबत कायदेशीर नोटीस देणे, तालुकानिहाय मोठे २० थकबाकीदारांच्या याद्या तयार करून जप्ती आदेशानुसार नोंदीची कारवाई करणे, स्थावर लिलाव प्रक्रिया राबविणे, मोठे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेस शासनाने डिसेंबर अखेरपर्यंत मुदत वाढ दिली असून, या योजनेत भाग घेणाऱ्या कर्जदारांकडील कर्जाची थकबाकी झाल्यापासून एकूण व्याज रकमेवर ५० टक्के सवलत किंवा जास्तीत जास्त रुपये साडेचार लाखांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. योजनेत १,३५५ सभासदांनी भाग घेऊन योजनेचा लाभ घेतला आहे.