नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव पाठविण्याची मुदत काल (दि.२०) सायंकाळी सहा वाजता संपुष्टात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून रात्री उशिरापर्यंत ठराव झालेल्या प्रतिनिधींची व ठरावांचे संकलन करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, प्रतिनिधींचे ठराव पाठविण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी डॉ. गिरीश मोहिते यांनी जिल्हा उपनिबंधकांना एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याअनुषंगाने बॅँकेच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र ठरवून सहकारी, गृहनिर्माण व अन्य सहकारी संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव मागविण्याचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला असून, त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे या प्रतिनिधींचे ठराव पाठविण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी होती. त्यासाठी गावोगावी ठराव करण्यासाठी रात्रंदिवस सहकार क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंची धावपळ सुरू होती. २० फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत या बॅँक प्रतिनिधींचे ठराव पाठविण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र शुक्रवारी (दि.२०) रात्री उशिरापर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून झालेल्या ठरावांची व ठरावानुसार मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या प्रतिनिधींची नावे संकलित करण्याचे काम सुरू होते.
जिल्हा बॅँक निवडणूक : ठराव पाठविण्यास मुदतवाढीची मागणी,
By admin | Updated: February 21, 2015 01:34 IST