नाशिक : ‘स्मार्ट सिटी’ अभियानात टॉप २० मध्ये समावेश होऊ न शकलेल्या नाशिकला आता केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने घोषित केलेल्या यादीत नाशिक ३१व्या क्रमांकावर असून, पहिल्या वीस शहरांमध्ये महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ ही महत्त्वाकांक्षी योजना २ आॅक्टोबर २०१४ पासून देशात सुरू केली. या स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होते आहे किंवा नाही यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने देशभरातील ७५ शहरांची निवड करत त्याठिकाणी स्वच्छतेसंबंधीची पाहणी केली. त्यात नाशिक शहराचा समावेश होता. सदर सर्वेक्षणानंतर मूल्यांकन करत शहरांना श्रेणी बहाल केली जाणार होती. त्यानुसार, केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ शहरांची यादी घोषित केली. पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये नवव्या क्रमांकावर पिंपरी चिंचवड तर दहाव्या क्रमांकावर बृहन्मुंबईचा समावेश आहे. नाशिक मात्र ३१ व्या क्रमांकावर असून पुणे- ११, नवी मुंबई- १२, ठाणे- १७ आणि नागपूर- २० व्या क्रमांकावर आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत सदर सर्वेक्षण करण्यात आले होते. मागील महिन्यात ८ ते ११ जानेवारी या कालावधीत नाशिक शहराचा स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी आश्विनीकुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक नाशिक दौऱ्यावर आले होते. सदर पथकाने शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या शौचालय योजनेची, तसेच कचरा संकलनाच्या प्रक्रियेची माहिती संकलित केली होती. त्यासाठी पथकाने नागरिकांशीही संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली होती. महापालिकेने नंतर ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमाही राबविल्या होत्या. परंतु, स्मार्ट सिटी अभियानापाठोपाठ केंद्राच्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतही नाशिकला हुलकावणी मिळाली. प्रामुख्याने, गोदावरी नदी प्रदूषणासह शहरातील खतप्रकल्पासंदर्भात उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेचे वारंवार कान उपटले आहेत. परंतु, महापालिका त्यावर ठोस उपाययोजना राबवू शकलेली नाही. दरम्यान, केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने उदयोन्मुख शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश केला असल्याने भविष्यात नाशिक महापालिका आता काय सुधारणा करते, यावरच पुढच्या वेळी यादीत वरचा क्रमांक अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
नाशिकला हुलकावणी
By admin | Updated: February 16, 2016 01:10 IST