येवला : बाभूळगावच्या सरपंचांविरोधातील अविश्वास ठराव सर्वच सदस्य विशेष सभेला गैरहजर राहिल्याने फेटाळण्यात आला. विशेष म्हणजे विशेष सभेला ज्या सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता ते सदस्यही बैठकीस अनुपिस्थत होते. बाभूळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश प्रभाकर वाबळे यांच्या विरोधात ११सदस्यांपैकी ८ सदस्यांनी तहसीलदारांकडे दि.२२ जुलै रोजी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. यामुळे बहुमताने हा ठराव पारित होणार असा विश्वास सर्वांना होता. मात्र २७ जुलै रोजी तहसीलदार शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र सर्वच सभासद गैरहजर राहिल्याने उपसरपंच देवीदास निकम यांनी दाखल केलेला अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आला. विशेष सभेला उपसरपंच देवीदास निकम व सदस्या वंदना भालेराव हे हजर होते.मात्र या दोघांनीही इतर सदस्य गैरहजर असल्याचे बघून अनुपस्थित राहणे पसंत केले. यामुळे विशेष सभेला सर्वच सदस्य गैरहजर राहिल्याने तहसीलदार मंडलिक यांनी विद्यमान सरपंच रूपेश वाबळे यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ व मुंबई ग्रामपंचायत नियम १९७५ मधील तरतुदीनुसार दाखल झालेला ठराव फेटाळण्यात आल्याचे जाहीर केले. विशेष सभेला ग्रामसेवक रावसाहेब वानखेडे उपस्थित होते. (वार्ताहर)
सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव फेटाळला
By admin | Updated: July 31, 2016 00:03 IST