नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेच्या आरोग्य व ड्रेनेज विभागामार्फत ठेकेदारामार्फत स्वच्छतेची कामे करून घेण्यात आली, परंतु आता बिले अदा करण्याची वेळ येऊन ठेपल्यावर याच दोन विभागांतील विसंवाद समोर आला आहे. कामगारांचे पूर्ण वेतन अदा केल्याशिवाय ठेकेदाराची बिले मंजूर करायची नाही, असा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला असताना ड्रेनेज विभागाने मात्र कामगारांचे वेतन अदा केले नसतानाही ठेकेदाराला आरटीजीएसद्वारे बिल अदा करण्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेतील दोन विभागांतील वेगवेगळ्या करारनाम्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात महापालिकेने स्वच्छतेच्या कामांचे आउटसोर्सिंग करत साधुग्राम, गोदाघाट परिसर, भाविक मार्ग याठिकाणच्या साफसफाईवर नियंत्रण ठेवले. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत गोदाघाट परिसर तसेच भाविक मार्गावरील स्वच्छतेसाठी वेगळा ठेका देण्यात आला, तर साधुग्रामसाठी स्वतंत्र ठेका काढण्यात आला असता स्थायीवर संबंधित ठेकेदार काळ्या यादीत असल्यावरून वाद उद्भवला. प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचल्याने महापालिकेने साधुग्रामसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून गोदाघाट व भाविकमार्गाचे काम पाहणाऱ्या ठेकेदारांकडूनच अतिरिक्त काम करून घेतले. मात्र, सदर ठेकेदारांना वेतन अदा करण्यासंबंधी करारनाम्यात काही अटी-शर्ती टाकण्यात आल्या. त्यानुसार ठेकेदारांकडून संबंधित कामगारांची रोज बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. बॅँकेत त्यांची खाती उघडून त्यांना एटीएम कार्ड देण्यात आले. दर आठवड्याला कामगारांना वेतनही अदा करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराने कामगारांना पूर्ण पैसे अदा केल्यानंतरच आरोग्य विभागाकडे एकत्रित बिले सादर करावीत, खात्री झाल्यानंतरच ठेकेदारांना त्यांचे संपूर्ण बिल अदा करण्याचा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला. आरोग्य विभागाप्रमाणेच ड्रेनेज विभागाकडूनही साधुग्राम, भाविकमार्ग तसेच घाट परिसरातील शौचालये, मुताऱ्या साफ करण्याचा ठेका देण्यात आला.
स्वच्छतेच्या ठेक्याबाबत दोन विभागांमध्ये विसंवाद
By admin | Updated: October 5, 2015 23:00 IST