नाशिक : महापालिकेच्या महासभेत मुकणे पाणीयोजनेवर चर्चा सुरू असतानाच नगरसेवकांनी पाणीटंचाईबद्दल सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला घेरले आणि मुकणे पाणीयोजनेला मंजुरी मिळावी म्हणून पाणीकपातीचे भूत उभे केल्याचा आरोप केला. ऐन सणासुदीच्या काळात पाणीकपातीला आक्षेप घेत सदस्यांनी पाणीगळती थांबविण्यावर उपाययोजना करण्याची सूचना केली.मुकणे पाणीयोजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव महासभेवर चर्चेला आला असता सदस्यांनी प्रभागांमध्ये कुठे कमी दाबाने, तर कुठे पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारींचा वर्षाव केला. अगोदर प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करा, पाणी वितरणाचे नियोजन व्यवस्थित करा नंतरच मुकणे पाणीयोजनेचा विचार करा, असा सल्लाही सदस्यांनी दिला. शिवाजी गांगुर्डे यांनी कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथे पाणीगळती थांबविण्याबाबत निवेदन देऊनही दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त केली. संभाजी मोरुसकर यांनी शहरातील कामे ठप्प झाल्याचा आरोप केला. सुदाम कोंबडे यांनीही पाथर्डी परिसरातील पाण्याची बिकट स्थिती कथन केली. दिनकर पाटील यांनी नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्याची मागणी केली, तर रंजना पवार यांनी उपवासाचे दिवस असताना महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची व्यथा बोलून दाखविली. दामोदर मानकर यांनी तर स्पील ओव्हर वाढवा, पण आमच्या प्रभागातील कामे मार्गी लावा, असा अजब सल्ला दिला. वंदना बिरारी यांनी तर घणाघाती भाषण करत प्रशासनाची पिसे काढली. अखेर आयुक्तांनी पाणी वितरणात भरपूर त्रुटी असल्याचे मान्य करत वॉटर आॅडिटला सुरुवात झाल्याचे सांगितले, तर महापौरांनी पाणीबचतीबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देतानाच अनधिकृत व अतिरिक्त नळजोडणीधारकांवर कारवाईचे आदेश दिले. चर्चेत अन्य नगरसेवकांनी सहभाग घेतला.
चर्चा मुकणेची, दुखणे पाणीकपातीचे!
By admin | Updated: October 18, 2015 00:04 IST