ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला निवृत्ती रेवगडे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.सरपंच निर्मला रेवगडे या कामे करताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात आदिंसह विविध कारणे देत सात ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली पाडळी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बुधवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित केली होती. अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाल्यानंतर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच भगीरथ रेवगडे, अनिता जाधव, अरुणा रेवगडे, रावसाहेब बोगीर, कविता शिंदे, ललिता कडाळे, अशोक जाधव यांनी मतदान केले, तर सरपंच निर्मला रेवगडे व योगेश रेवगडे यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. ९ पैकी ७ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने ठराव मंजूर करण्यात आल्याची घोषणा तहसीलदार खैरनार यांनी केली. या अविश्वास ठरावाकडे तालुक्याच्या पश्चिम भागाचे लक्ष लागून राहिले होते. (वार्ताहर)
पाडळी सरपंचावर अविश्वास ठराव अखेर मंजूर
By admin | Updated: September 8, 2016 00:48 IST