नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ बारा महिन्यांसाठी ठरलेला असताना नियोजित काळात पदावरून पायउतार होण्यास अध्यक्ष तयार नसल्यानेच सहकारी संचालकामंध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अध्यक्ष कोणीही होवो, आधी ठरल्यानुसार विद्यमान अध्यक्ष- उपाध्यक्षांनी राजीनामा द्यावा, असा सूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकामंध्ये असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मागील वर्षी जूनमध्ये ऐन सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसने पत्ते ओपन करीत तत्कालीन राष्ट्रवादीत असलेले नरेंद्र दराडे यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी संचालक राजेंद्र भोसले यांच्या पॅनलमधून निवडणूक लढवून विजयी झालेल्या नरेंद्र दराडे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अचानक पवित्रा बदलला होता. तिकडे अध्यक्षपदी नरेंद्र दराडे निवडून आल्यावर सर्वप्रथम माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कॉलेजरोडवरील संपर्क कार्यालयात येऊन आपण कोकाटे-पिंगळे-भोसले गटाचे अध्यक्ष असल्याचे नरेंद्र दराडे यांनी जाहीर केले होते. ही बातमी कळताच दुसऱ्या गटाच्या संचालकांनी त्यांना लगोलग आपण कोणत्याच गटा-तटाचे अध्यक्ष नसल्याचे सांगण्याची घळ घातल्याने अवघ्या तासाभरातच नरेंद्र दराडे यांनी त्यांच्या कॉलेजरोडवरील बंगल्यात माध्यम प्रतिनिधींना आपण दोन्ही गटाचे अध्यक्ष असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता वर्षभराचा कार्यकाळ उलटूनही अध्यक्ष पायउतार होण्यास तयार नसल्यानेच सर्व संचालकांनी एकत्र येत आता त्यांना पायउतार करण्याचा चंग बांधल्याची चर्चा आहे. अविश्वास ठराव बारगळण्यासाठी आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी हालचाली गतिमान झाल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)
अध्यक्ष शब्द पाळत नसल्यानेच अविश्वास
By admin | Updated: September 11, 2016 02:20 IST