नाशिक : पर्वणी काळात आपत्तीची घटना घडल्यास अवघ्या दोन ते पाच मिनिटांच्या कालावधीत बचाव व मदत कार्य पोहोचविण्यासाठी शहरात सात ठिकाणी अमेरिकेच्या धर्तीवर ‘स्टेजिंग एरिया’ म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज ठेवण्याची तयारी करणाऱ्या प्रशासनाने या कक्षात तैनात असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा न पुरविल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असून, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकाऱ्यांना खिशातून पैसे खर्च करून वस्तू खरेदी कराव्या लागल्या आहेत. स्टेजिंग एरियामध्ये तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७२ तास या ठिकाणी कार्यरत राहावे लागणार असल्याने त्यांच्या निवासाची, खान-पान, स्वच्छतागृह आदि व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. या स्टेजिंग एरियामध्ये जेसीबी, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, डंपर, वैद्यकीय पथक, वीज कंपनीचे कर्मचारी, पोलीस अशा प्रकारे आपत्तीत बचाव व मदत कार्य करणाऱ्या यंत्रणांचा समावेश असून, साधारणत: शंभर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. स्वच्छतागृहात भांडे नसल्याने अधिकाऱ्यांनी खिशातून पैसे खर्च करीत व्यवस्था करून घेतली. त्यातच या पथकामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे तर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुढे आला. अनेक स्टेजिंग एरियामध्ये शुक्रवारी सकाळपर्यंत दूरध्वनी, हॉटलाइन सेट कार्यान्वित करण्यात आलेले नव्हते तर अधिकाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्चीचीही सोय नसल्याने अनेकांना जमिनीवरच बस्तान मारावे लागले. काही ठिकाणी पुरेशा विजेची सोय नसल्यानेही खोळंबा झाला. (प्रतिनिधी)
आपत्ती व्यवस्थापन कक्षात सुविधांची वानवा
By admin | Updated: August 28, 2015 23:25 IST