तालुक्यात पर्यटन वाढल्याने गोरगरीब भाविकांना तसेच गाईड व छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना पोटापाण्यापुरता रोजगार मिळत आहे. पण शासनाने संचारबंदी लागू केल्याने गावात जाणारी वाहने बॅरिकेडिंग लावून बाहेरच्या बाहेर थोपविण्यात आली आहेत. जव्हारफाटा परिसरात सर्व खासगी वाहने उभी करण्यात येत असल्याने तेथून हातात बॅग व मोठ्या पिशव्या घेऊन भाविक, पर्यटक यांची ससेहोलपट सुरू आहे. श्रावण सोमवारच्या प्रदक्षिणेवर बंदी असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्र्यंबकेश्वरला कसे येत आहेत ? विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरला भाविक पर्यटक येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन बॅरिकेडिंग लावून तसेच पोलीस फोर्स लावून उपाययोजना करावी लागत आहे. दर्शनीय तथा प्रेक्षणीयस्थळांकडे जाण्यासाठी पोलीस मनाई करत आहेत. हिच गर्दी पोलीस नाशिकला का अडवत नाही, असा सवाल त्र्यंबकेश्वरचे व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.
शासनाने स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकाऱ्यांना दिले असताना ते निर्णय घेण्याची जबाबदारी घेत नाहीत. कारण त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तालुका कोरोनामुक्त आहे; परंतु नवीन रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच डेंग्यू व चिकुनगुन्या आदी साथींचे आजार उद्भवले असताना आम्हाला स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेऊ शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, शनिवार, रविवार व सोमवारी पतेती (पारशी नववर्ष) हे सलग तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने त्र्यंबकेश्वरला नेहमीपेक्षा भाविक, पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
इन्फो...
त्र्यंबकचा कायापालट होणार
सध्या जोरदार पाऊस नसला तरी सारखी रिपरिप सुरू आहे. साहजिकच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणाऱ्या, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या निसर्गप्रेमींना सध्याचे वातावरण आकर्षित करण्यायोग्य आहे. यासाठी त्यांचा कल त्र्यंबककडे वाढणे साहजिकच आहे. तसेच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात, पर्यटनस्थळांत वाढ होणे गरजेचे आहे. जेणेकरून रोजगाराच्या संधी वाढल्या पाहिजेत, यासाठी पर्यटनास वाव द्या. रोजगाराच्या संधी उपलब्ध करा. यासाठी केंद्र सरकारने प्रसाद योजना त्र्यंबकेश्वरसाठी गत दोन वर्षांपासून मंजूर केली आहे. लवकरच या योजनेमुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार आहे. सध्या या योजनांची कामे त्र्यंबकेश्वर व अंजनेरी येथे सुरू आहेत.