नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गावरील संदीप पॉलिटेक्निक येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्र्यंबकेश्वरची बस नाकारली जात असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सकाळी मेळा स्थानकातील अधिकाऱ्यांना घेराव घातला. कॉलेजला जाताना आणि येतानाही महामंडळाच्या बसेसमध्ये बसू दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील असंख्य विद्यार्थी महिरावणी येथील संदीप पॉलिटेक्निक महाविद्यालयात जातात. या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून बस पासदेखील देण्यात आलेला आहे; मात्र त्यांना जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर बसमधून प्रवास नाकारला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत बस भरत नाही तोपर्यंत बसमध्ये बसूच दिले जात नाही. शिवाय बसमध्ये चढल्यानंतरही उभे राहून प्रवास करण्याचे वाहकाकडून सांगण्यात येते. बस पास असूनही अशाप्रकारची वागणूक मिळत असल्याने शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांनी येथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी याप्रकारचा त्रास सहन करीत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मार्गे जाणाऱ्या बसेसमधून विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले; मात्र कायमस्वरूपी ही व्यवस्था नसल्याचा खुलासाही अधिकाऱ्यांनी केल्याने सदर प्रश्न कायम आहे. (प्रतिनिधी)
पास असूनही बस नाकारल्याने विद्यार्थ्यांचा संताप
By admin | Updated: January 20, 2017 23:51 IST