नाशिक : आदर्श पुरस्कार घेऊन काही दिवसच झालेले पेठचे ग्रामसेवक मनोहर चौधरी या ना त्या कारणाने चर्चेत असून, आता इंदिरा आवास घरकुल योजनेतील एका गरीब लाभार्थ्याची अडवणूक केल्यावरून उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी काल (दि.१) या ग्रामसेवकाची झाडाझडती घेत थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे पेठ ग्रामपंचायतीतील १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतील गडबड केल्याच्या कारणावरून पेठ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे पेठच्याच एका ग्रामपंचायत सदस्याने तक्रार केल्यानंतर या दोघांना कलम ३९ (१) नुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. दरम्यानच्याच काळात मनोहर चौधरी यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले होते. तसेच मनोहर चौधरी यांनाच जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ही चौकशी सुरू असताना पुरस्कार देण्याबाबत काही बंधने व नियम असतानाही पुरस्कार दिल्यामुळे याबाबत ओरड झाली. त्यानंतर सुखदेव बनकर यांनी ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोेमवंशी यांना याबाबत सखोल चौकशीचे पत्र दिले होते. मात्र सोमवंशी यांनी या प्रकरणाकडे सोयिस्कर डोळेझाक केल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे. (प्रतिनिधी)
उपाध्यक्षांनी घेतली झाडाझडती : पेठ ग्रामपंचायतीतील प्रकार
By admin | Updated: January 1, 2015 23:43 IST