वरखेडा : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला बेमुदत संप पंधरा दिवस उलटूनही सुरूच आहे. या संपामुळे वरखेडा परिसरातील बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. आमची अंगणवाडीची ताई केव्हा येणार? आम्ही रोज त्रास देतो म्हणून आमच्या ताईला राग आला का, असा निरागस प्रश्न अंगणवाडीतील बालके आपल्या आईवडिलांना विचारत आहे. त्यामुळे संपावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांमधूनही होत आहे. मानधनात वाढ करावी, टेक होम रेशन (टीएचआर) बंद करावा, शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोयी -सुविधा मिळाव्या आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने राज्यभर ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला अंगणवाडी कर्मचाºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बालविकास विभागाने संघटनेसोबत मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेतल्या. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सेवाज्येष्ठतेनुसार व शिक्षणावर आधारित मानधन वाढ देण्यात यावी ही कर्मचाºयांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे शासनाचा हा प्रस्ताव धुडकावत बेमुदत संप कायम ठेवला आहे. संपाबाबत सन्माननीय तोडगा निघत नसल्याने लाभार्थी बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्यासाठी शासनाच्या वतीने स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांची एक समिती गठित करून त्यामार्फत आहार पुरवठा करणारे बचतगट आणि आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या लाभार्थींना पोषण आहार व आरोग्यसेवा देण्यात याव्यात, असा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे तसे आदेशही स्थानिक पातळीवरील घटकांना दिले आहेत. परंतु त्यातही प्रशासनाला अडचणी जाणवत आहेत.बचतगट पोषण आहार शिजवून देण्यास तयारआहेत; पण वाटप करण्यास नाखुशी दर्शवत आहेत. त्याबरोबरच संप कालावधीतील पोषण आहाराची देयके मिळतील का? याबाबतही सांशक आहेत. तसेच तीन ते सहा वयोगटातील लाभार्थींची यादी अंगणवाडी सेविकेकडे असते त्यामुळे आहार वाटपात अनंत अडचणी येण्याची शक्यता जास्त आहे.
पोषण आहार वाटपाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:29 IST