दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील कानिफनाथ मंदिरातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जानोरी ते मढी येथे पायी पदयात्रेचे प्रस्थान झाले. रंगपंचमीनिमित्त मढी ता. पाथर्डी जि. नगर येथे चैतन्य कानिफनाथांची यात्रा भरते.जानोरी येथील कानिफनाथ मठाचे गुरूवर्य ब्रम्हलीन गोविंदकाका राहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या विस वर्षापूर्वी पदयात्रेस अवघ्या सात भक्तांपासून सुरूवात झाली. तिच्यात लक्षणीय वाढ होऊन यावर्षी ती दिडशेपर्यंत पोहचली. नऊ दिवसांचा एकशे नव्वद किलोमीटरचे अंतर कापत ओझर ,वावी, लोणी, शनी शिंगणापूर ,घोडेगाव ,मिरी अशा ठिकाणी भेट देत रंगपंचमीला पोहचते. यात्रेसाठी यावर्षी सोपान राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ कदम, जगदीश मौले, सुनील गांगुर्डे, दर्शन मेडिकल (आरोग्य सेवा) ,प्रकाश डांगोरकर (जलसेवा) तसेच अनेक दानशूर भक्तांचे आर्थिक तसेच अन्नदान स्वरूपात सहकार्य लाभले. दिंडी व्यवस्थापक म्हणून रामदास कर्वे, मल्हारी मोहिते, प्रशांत श्रीखंडे, लहांगे, शंकर चारोस्कर ,सुभाष नेहरे ,राकेश गणोरे व इतर सहकारी कार्य बघतात. पदयात्रेस निरोप देण्यासाठी मंदिर देवस्थानचे सोपान राहाणे, बाळासाहेब काठे ,शंकर ठाकूर, मधुकर पुंड,रावसाहेब घुमरे व गावातील ग्रामस्थ, नाथभक्त उपस्थित होते.
जानोरी ते श्रीक्षेत्र मढीसाठी पायी दिंडीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:50 IST