नाशिक : स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप. बॅँकेच्या भ्रष्टाचार आणि बॅँकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्याबाबत कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉँग्रेस (इंटक)च्या वतीने येथील विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.याबाबत इंटकच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टेट ट्रान्सपोर्ट को- आॅप. बॅँकेला २०१५ - १६ या आर्थिक वर्षात ११ कोटी ४२ लाख ९५ हजार ४५४ रुपये नफा झाला आहे. मात्र अनागोंदी कारभारामुळे बँकेच्या लाभांश वाटप करण्यावर रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातले आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप. बॅँकेच्या सभासदांना दरवर्षी १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा आहे, परंतु बँकेतील आंतर शाखा व्यवहाराचे समायोजन पूर्ण झालेले नसून त्या खात्यामध्ये डेबिट बाजूस ८९ कोटी ४९ लाख रुपयांची ताळमेळ अद्यापपर्यंत लागलेला नाही. तसेच बॅँकेच्या स्वारगेट, दापोडी (पुणे), कोल्हापूर व मुंबई या शाखांसाठी रिझर्व्ह बॅँकेकडून बॅँकिंग व्यवसाय करण्यासाठी परवाना घेतला नाही. यासंदर्भात चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी. तसेच एसटी कर्मचारी सभासदांच्या हक्कांच्या लाभाशांची रक्कम तत्काळ देण्यात यावी, बँकेतील अनागोंदी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, स्थानिक सल्लागार समिती सदस्याची निवडणूक लोकशाही पद्धतीने तत्काळ घेण्यात यावी यांसह दहा मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात विभागीय सचिव आर. डी. गवळी, विभागीय अध्यक्ष सी. एम. सानप यांच्यासह अशोक जाधव, रमेश इप्पर, दिलीप सूर्यवंशी, विजय गायकवाड, नामदेव जाधव, विजय जाधव आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
इंटक संघटनेच्या वतीने निदर्शने
By admin | Updated: October 21, 2016 02:39 IST