नाशिक : एचपीटी आर्ट्स आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयातर्फे बुधवारी (दि.६) पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयतील विद्यार्थ्यांसाठी ‘मीडियावर बोलू काही’ या स्पर्धेअंतर्गत आवडते वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी याबद्दलच्या माहितीचे सादरीकरण दाखविण्यात येणार आहे, तसेच अॅड. मोतीलाल जठार यांनी केलेल्या जगभरातील वेगवेगळ्या वृत्तापत्रांच्या संग्रहाचे प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे.बुधवार (दि.६) ते शुक्रवार (दि.८) या कालावधीत वृत्तपत्रांच्या संग्रह प्रदर्शनात मराठी, अरबी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराथी, हिंदी, कन्नड, कोकणी, मैथिली, मल्याळम, नागा, नेपाळी, रशियन, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तामीळ, तेलगू, नागालॅण्ड, उर्दू, फे्रंच यांसह विविध भाषांतील तब्बल ७०१ वृत्तपत्रांचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. महाविद्यालयातर्फे आयोजित या स्पर्धेचा आणि प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, विद्यार्थी सभा प्रतिनिधी सुरेश नखाते, प्रा. आर. टी. अहेर यांनी केले आहे.
जगभरातील विविध वृत्तपत्रांचे प्रदर्शन
By admin | Updated: January 4, 2016 00:01 IST