मालेगाव : शहरात महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर पट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे मालेगाव युवा संघटना व महिलांनी केली आहे.शहरात अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी अपुरे सोडले जात आहे. यात ते नियमित व वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पाण्याची वाट पाहण्याची वेळ येते. त्यातच होणारा पाणीपुरवठा अशुद्ध आहे. येथील मनपा दहा ते बारा वर्षांपासून एक दिवसाआड मानसी ४५ लिटर पाणी पुरवते. त्यात काही महिन्यांपासून इतकेच पाणी दोन दिवसाआड पुरविले जाते आहे. पाणीपुरवठ्यात मोठी कपात झाल्याने पट्टी कमी करणे अपेक्षित होते; मात्र येथील मनपाने पाणीपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. महागाई व दुष्काळाने रहिवाशांचे कंबरडे मोडले आहे. पाणीपट्टीत केलेली वाढ ही अन्यायकारक असून, याविरोधात कोणताही आवाज उठविला जात नाही. शहरात जेवढा पाणीपुरवठा केला जातो त्यावरच पाणीपट्टी आकारली जावी, अशी मागणी मोनाली देवा पाटील यांनी शिष्टमंडळासह केली आहे. यावेळी विजया राठी, वंदना कोतकर, नीता जैन, ललिता अमृतकर, सुनीता राठी, सुरेखा शिरुडे, प्रमिला अग्रवाल आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
मालेगावी वापरानुसार पाणीपट्टी आकारण्याची मागणी
By admin | Updated: January 9, 2016 22:37 IST