कळवण : वादग्रस्त ठरलेल्या बागलाण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे कळवणच्या शिक्षण विभागाचा पदभार देऊन कळवण तालुक्यातील आदिवासी जनतेची यंत्रणेने थट्टा केली आहे. त्यांचा तत्काळ पदभार काढून घ्यावा नाहीतर शिक्षण विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा कळवण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांनी दिला आहे. शिक्षण क्षेत्रात गाजलेल्या गणवेश घोटाळ्यातील दोषीकडे कळवणचा पदभार देऊन यंत्रणेला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती वर बागलाण तालुक्यातील शिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. चाळीसगावच्या गणवेश घोटाळ्यातील प्रमुख आणि बागलाण पंचायत समितीत वादग्रस्त ठरलेले गटशिक्षण अधिकारी बी. टी. पाटील यांची बदली करण्याच्या मागणीसाठी बागलाण पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मागणी लावून धरलेली असताना, अशा वादग्रस्त गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दिलेला पदभार तत्काळ काढून घ्यावा, असा ठराव कळवण पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे. पाटील चाळीसगाव तालुक्यात गटशिक्षण अधिकारी असताना ५५ लाख रु पयांच्या गणवेश घोटाळ्यात त्यांची चौकशी झाली होती. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांची बदली करण्यात आली. अधिकार नसताना त्यांनी बागलाण तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, त्या बदल्याही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या असून, सदर बदल्या करताना आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या लेटरहेडचा सर्रास गैरवापर करून आर्थिक लूट केल्याचा आरोप बागलाण पंचायत समितीच्या सदस्यांनी केला आहे. अशा व्यक्तीकडे कळवणचा पदभार देऊन जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभाग चुकीचा पायंडा पाडत असल्याचा आरोप उपसभापती अॅड. संजय पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)
वादग्रस्त गटशिक्षणाधिकाऱ्यांकडील पदभार काढण्याची मागणी
By admin | Updated: December 4, 2015 22:54 IST